टीका-टिप्पणी बाजूला; बाप्पाच्या भक्तीत नेतेमंडळीही रमली, सोशल मीडियावर रिल्सची रंगत
अलिबाग (प्रतिनिधी): राजकारण म्हटले की आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी आणि एकमेकांवर कुरघोडी हे चित्र नेहमीच पाहायला मिळते. मात्र, गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात राजकीय मतभेद काही काळ बाजूला ठेवून अनेक राजकीय नेते आणि पदाधिकारी गणरायाच्या भक्तीत रमल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, गणपती बाप्पाच्या लोकप्रिय गाण्यांवर रिल्स बनविण्याचा मोह राजकारणी मंडळींनाही आवरता आलेला नाही.
गणेशोत्सवात सोशल मीडियावर विविध ट्रेंडिंग गाणी, पारंपरिक आरत्या आणि भक्तिगीतांवर रिल्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. तरुणाईपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेकजण या रिल्सच्या माध्यमातून गणेशोत्सवाचा आनंद व्यक्त करत आहेत. यामध्ये राजकीय नेते आणि पदाधिकारीही मागे राहिलेले नाहीत.
मंत्री अदितीताई तटकरे,आमदार अनिकेत तटकरे,सभापती रसिकाताई केणी, जिल्हा परिषद सदस्या अदिती नाईक-दळवी, पंचायत समितीच्या माजी सदस्या जुईली दळवी तसेच शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनीही गणपती बाप्पाच्या गाण्यांवर रिल्सच्या माध्यमातून उत्साह व्यक्त केला आहे. राजकीय व्यासपीठावर एकमेकांवर टीका करणारी ही मंडळी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मात्र बाप्पाच्या भक्तीत आणि सोशल मीडिया ट्रेंडमध्ये रमलेली दिसत आहेत.
राजकीय मतभेद आणि पक्षीय भूमिका आपल्या जागी असल्या तरी सण-उत्सवाच्या निमित्ताने निर्माण होणारा आनंद आणि उत्साह सर्वांना एकत्र आणतो, हे या रिल्समधून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे सध्या राजकीय वक्तव्यांपेक्षा गणपती बाप्पाच्या गाण्यांवरील या रिल्सचीच सोशल मीडियावर अधिक चर्चा रंगताना दिसत आहे.









