शिक्षिकेची बदली करून देण्यासाठी दीड लाखांची लाच घेतल्याचा आरोप; व्यवहारामागील सूत्रधाराचा शोध घेण्याचे आव्हान
अलिबाग (प्रतिनिधी) : शिक्षिकेची बदली करून देण्यासाठी तिच्या पतीकडून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या योगेश भस्मे याला गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने भस्मे याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कारवाईमुळे रायगड जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या लाच प्रकरणाच्या तपासात आता ‘साहेब’ या उल्लेखामागील व्यक्ती कोण, याचा शोध महत्त्वाचा ठरणार आहे.
योगेश भस्मे हा रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागात सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तसेच तो जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचा स्वीय सचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळत होता. त्यामुळे त्याच्यावर झालेल्या लाच स्वीकारण्याच्या कारवाईने जिल्हा परिषदेतील प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.
तक्रारदार यांच्या पत्नीला जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या समुपदेशन प्रक्रियेत तळा तालुक्यातील शाळा मिळाली होती. मात्र त्यांना सुधागड तालुक्यातील शाळेत बदली हवी होती. याच पार्श्वभूमीवर भस्मे याने तक्रारदाराला ‘माझ्या ओळखीने साहेबांना सांगून शाळा बदलून देतो,’ असे सांगितल्याचा आरोप आहे. त्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. बुधवारी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना भस्मे याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली.
‘साहेब’पर्यंत तपास पोहोचणार?
या प्रकरणातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे भस्मे याने तक्रारदाराला केलेला कथित ‘साहेबांना सांगून बदली करून देतो’ हा उल्लेख. बदली करून देण्याचे आश्वासन देताना भस्मे नेमक्या कोणाच्या नावाचा किंवा पदाचा आधार घेत होता, याचा तपास आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागासमोर आहे.
दीड लाख रुपयांच्या या कथित व्यवहारात भस्मेपुरताच सहभाग होता की त्यामागे आणखी कोणी व्यक्ती होती, याचाही तपास होणे अपेक्षित आहे. पोलीस कोठडीच्या कालावधीत भस्मेकडून या व्यवहारासंदर्भात कोणती माहिती समोर येते आणि तपासाची दिशा कोणत्या व्यक्तींपर्यंत पोहोचते, याकडे जिल्हा परिषद वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणातील आरोपांची चौकशी सुरू असून, तपासातून समोर येणाऱ्या तथ्यांनुसार पुढील कारवाईचे चित्र स्पष्ट होणार आहे.









