वैयक्तिक टीका खपवून घेतली जाणार नाही : जिल्हाप्रमुख राजाभाऊ केणी


‘चार महिन्यांत पक्षावर बोलण्याची पत कुठून आली?’; महेंद्र दळवींच्या समर्थनार्थ शिवसेनेची आक्रमक भूमिका

अलिबाग (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत मनोज शिंदे यांनी शिवसेना, आमदार महेंद्र दळवी आणि पक्षाच्या नेत्यांवर केलेली टीका खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाऊ केणी यांनी पत्रकार परिषदेत दिला. विकासकामांच्या भूमिपूजनावरून झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी मनोज शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीवरही गंभीर आरोप केले.

मनोज शिंदे यांनी यापूर्वी दोन वेळा पक्ष आणि आमदारांवर टीका केली होती. त्यावेळी शिवसेनेने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, आता तिसऱ्यांदा त्यांनी पक्ष आणि नेत्यांवर टीका केल्याने त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असे केणी यांनी स्पष्ट केले.

अलिबाग परिसरातील एका विकासकामाच्या भूमिपूजनावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये निर्माण झालेल्या वादाचा संदर्भ देत केणी म्हणाले की, संबंधित कामासाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी असल्याचे आमदार महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केले होते. तसेच कार्यक्रमासाठी प्रोटोकॉलनुसार आमदारांना निमंत्रित करण्यात आले नसल्याची बाबही त्यांनी मांडली होती. या विषयावरून मनोज शिंदे यांनी शिवसेना आणि आमदारांवर टीका करणे योग्य नसल्याचे केणी यांनी सांगितले.

‘चार महिन्यांतच पक्षावर टीका करण्याची पत कुठून आली?’

मनोज शिंदे यांनी अलिबागमध्ये येऊन शिवसेनेवर टीका करण्यापूर्वी स्वतःची राजकीय पार्श्वभूमी तपासावी, असा टोला केणी यांनी लगावला. शिंदे यांनी आजपर्यंत ग्रामपंचायत निवडणूकही लढवलेली नाही. शिवसेना एकसंध असताना ते तालुकाप्रमुख होते. त्या काळात ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांपेक्षा स्वतःच्या राजकीय हिताला प्राधान्य दिल्याचा आरोपही केणी यांनी केला.

तटकरे कुटुंबीयांबाबत आमदार महेंद्र दळवी यांना सल्ला देण्याचा अधिकार मनोज शिंदे यांनी सांगू नये, असेही केणी म्हणाले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, त्या काळात सुनील तटकरे यांना युतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी जिल्ह्यातील वातावरण प्रतिकूल असतानाही महेंद्र दळवी यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे महायुतीमध्ये एकमेकांशी राजकीय चर्चा आणि सल्लामसलत होणे ही सामान्य बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘राष्ट्रवादी-शिवसेना वादाची ठिणगी मनोज शिंदेंमुळे’

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांनाही मनोज शिंदे कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप राजाभाऊ केणी यांनी केला. निवडणुकीच्या काळात तटकरे कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महेंद्र दळवी यांचे काम केले नाही, असा कानमंत्र आमदारांना देण्यात आला होता, असा दावा त्यांनी केला.

‘तटकरे यांना लोकसभेची उमेदवारी मिळू नये, त्यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांचे काम करणार नाही’, अशी भूमिका घेण्यासाठी आमदारांवर दबाव निर्माण करणाऱ्यांमध्ये मनोज शिंदे होते, असा आरोपही केणी यांनी केला. त्यामुळे सध्याच्या राजकीय वादाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी मनोज शिंदे यांची भूमिका तपासणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

रोहा येथील कामगारांच्या प्रश्नांपासून ते रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत मनोज शिंदे यांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित आहेत, असेही केणी यांनी सांगितले. मात्र, या सर्व आरोपांवर संबंधित मनोज शिंदे यांची भूमिका समोर आलेली नाही.

‘अलिबागमध्ये पक्ष वाढवा; पण शिवसेनेवर वैयक्तिक टीका नको’

मनोज शिंदे यांनी अलिबागमध्ये येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष वाढवावा, त्याला शिवसेनेचा विरोध नाही. प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यासाठी शिवसेना किंवा आमदार महेंद्र दळवी यांच्यावर वैयक्तिक टीका केली, तर ती सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा राजाभाऊ केणी यांनी दिला.

“मनोज शिंदे यांनी शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू नये. महायुतीतील एका पक्षाला कमजोर करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला शिवसेना आपल्या पद्धतीने उत्तर देईल. पक्ष वाढवण्याला आमचा विरोध नाही; मात्र वैयक्तिक टीका केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल,” असे केणी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.