श्रीबाग व म्हाडा कॉलनी परिसरात अलिबाग नगरपरिषदेचे स्वच्छता अभियान


मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्यासह नगरसेवक व आरोग्य विभागाच्या पथकाचा सहभाग

अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने अलिबाग नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने श्रीबाग क्रमांक २ आणि म्हाडा कॉलनी परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत परिसरातील स्वच्छतेवर भर देत सार्वजनिक ठिकाणांची पाहणी करण्यात आली. तसेच स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी आणि नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषदेकडून विविध भागांत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून श्रीबाग क्रमांक २ व म्हाडा कॉलनी परिसरात हे अभियान आयोजित करण्यात आले.

या स्वच्छता अभियानाला अलिबाग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  सागर साळुंखे, स्वच्छता व आरोग्य सभापती ॲड. मानसी म्हात्रे, नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते  संदीप पालकर, नगरसेवक  समीर (हुनी) ठाकूर आणि नगरसेवक जमाल सय्यद यांची उपस्थिती होती. यावेळी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचारीही सहभागी झाले होते.

या अभियानाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच स्वच्छतेच्या कामात नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा संदेश देण्यात आला. शहराचे सौंदर्य आणि नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी नगरपरिषदेने नियमित स्वच्छता मोहिमा राबवाव्यात, तसेच नागरिकांनीही आपल्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.