संकटाच्या काळात शेतकऱ्यांना शासनाचा आधार


रायगडमधील शेतकऱ्याला ५ हजारांचे सानुग्रह अनुदान सुपूर्द

रायगड-अलिबाग(जिमाका):- संकटाच्या वेळी जेव्हा हतबल झालेल्या मनाला मदतीचा एकछत्री आधार मिळतो, तेव्हा त्या दिलाशाचे शब्द नकळत ओठांवर येतात. निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेलेल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे काठी येथील प्रयोगशील शेतकरी रामकृष्ण आत्माराम मांजरेकर यांच्या चेहऱ्यावर सध्या असाच एक कृतज्ञ भाव दिसून येत आहे. अस्मानी संकटाने भातशेतीचे मोठे नुकसान केल्यानंतर, राज्याने आपल्या लेकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत दिलेला मदतीचा हात त्यांच्यासाठी मोठा मानसिक आधार ठरला आहे.
दुष्काळी आणि कठीण परिस्थितीतून आपल्या बळीराजाला सावरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तातडीने मदतीचा ओघ सुरू केला आहे. केवळ कागदी घोषणा न करता ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत आहे. नुकसानीच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी प्रशासनाने वेगाने पावले उचलली असून, त्याचाच एक भाग म्हणून श्रीवर्धन तालुक्यातील शेतकरी रामकृष्ण आत्माराम मांजरेकर यांना भातशेती नुकसानीपोटी ५,००० रुपयांचे सानुग्रह अनुदान थेट मिळाले आहे.
याबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना ते अत्यंत साध्या आणि मनमोकळ्या शब्दांत सांगतात, “मी रामकृष्ण आत्माराम मांजरेकर राहणार गालसुरे काठी,तालुका-श्रीवर्धन जिल्हा-रायगड. मी शेतकरी असून मला शासनाकडून भात शेतीचे नुकसान मानुग्रह अनुदान ५,००० रुपये मिळाले आहे. मी शासनाचा आभारी आहे.” त्यांचे हे साधे शब्द संकटात सापडलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या भावना व्यक्त करतात.
या निमित्ताने शासन आणि जिल्हा प्रशासनाची संवेदनशीलता स्पष्टपणे दिसून येते. संकटसमयी शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका प्रशासनाने बजावली आहे. प्रत्येक गरजू घटकापर्यंत पारदर्शक पद्धतीने मदत पोहोचत असल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
निसर्गाचे संकट कितीही मोठे असले, तरी राज्याची पावले आणि प्रशासकीय कर्तव्यपरायणता बळीराजाचे खचलेले मनोधैर्य उंचावण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, हाच एक सकारात्मक आणि आश्वासक संदेश यातून संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे.