पेझारी येथील पाटील परिवाराचे राजकीय आणि सामाजिक योगदान उल्लेखनीय; पदापेक्षा जनतेशी असलेल्या नात्याला अधिक महत्त्व
रायगड (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात ज्या राजकीय घराण्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे, त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील पाटील परिवाराचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय नारायण नागू पाटील यांनी घालून दिलेली राजकीय आणि सामाजिक कार्याची परंपरा ज्येष्ठ नेते स्वर्गीय दत्ता पाटील आणि प्रभाकर पाटील या बंधूंनी समर्थपणे पुढे नेली. त्यानंतरच्या पिढीतील मीनाक्षी पाटील, जयंत पाटील आणि पंडित पाटील यांनीही हा वारसा जपत जनतेशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही.
या परिवारातील एक महत्त्वाचे नेतृत्व म्हणजे पंडित पाटील. जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणारे आणि अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेणारे लढवय्ये नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. राजकीय सत्तेत असो अथवा सत्तेबाहेर, सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी ते नेहमीच तत्पर राहिले आहेत.
एखादी समस्या निर्माण झाल्यानंतर ती सोडविण्यासाठी सर्वप्रथम संबंधित प्रशासन आणि शासनदरबारी सनदशीर मार्गाने पाठपुरावा करण्यावर त्यांचा भर असतो. मात्र, वारंवार प्रयत्न करूनही जनतेच्या प्रश्नांची दखल घेतली जात नसेल, तर लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासही ते मागेपुढे पाहत नाहीत. राज्यकर्ते आणि प्रशासनाला जनतेच्या प्रश्नांची जाणीव करून देण्यासाठी संघर्षाची भूमिका घेणे, हा त्यांच्या राजकीय कार्यपद्धतीचा महत्त्वाचा भाग राहिला आहे.
राजकीय आणि सामाजिक संघर्षाचे संस्कार त्यांना बालपणापासूनच घरातून मिळाले. त्यामुळे अन्यायाविरोधात लढण्याचा बाणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात रुजलेला आहे. रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास संघर्ष, अनुभव आणि लोकसंपर्काची साक्ष देणारा आहे. विविध पदांवर काम करताना त्यांनी ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य दिले.
राजकारण करताना केवळ पक्षीय भूमिका न घेता समाजहित आणि विकासाला महत्त्व देणाऱ्या व्यक्तींना पाठिंबा देण्याची व्यापक भूमिकाही त्यांनी वेळोवेळी घेतली आहे. समाजासाठी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि जनतेच्या हिताच्या कामांना प्रोत्साहन देणे, ही त्यांची भूमिका राहिली आहे.
आज पंडित पाटील कोणत्याही राजकीय पदावर कार्यरत नसले, तरी सर्वसामान्य जनतेच्या मनातील त्यांचे स्थान कायम आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी धावून जाणारे, अडचणीच्या काळात आधार देणारे आणि अन्यायाविरोधात आवाज उठविणारे नेतृत्व म्हणून आजही नागरिक त्यांच्याकडे अपेक्षेने पाहतात.
राजकारणात पदे आणि सत्तास्थाने बदलत असतात; मात्र जनतेशी असलेले नाते, विश्वास आणि सामाजिक कार्यातून निर्माण झालेली ओळख दीर्घकाळ टिकून राहते. पंडित पाटील यांच्या आजवरच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीतून हेच अधोरेखित होते. पदापेक्षा जनतेशी असलेली बांधिलकी मोठी असते, याचे उदाहरण म्हणून त्यांच्या कार्याकडे पाहता येईल.








