जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती; सातबारा तयार झाल्यानंतर संबंधित धारकांच्या नोंदी करून वितरण करणार
रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील दळी जमिनींचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या जमिनींना स्वतंत्र सर्व्हे नंबर नसून त्यांची नोंद कंपार्टमेंटच्या स्वरूपात करण्यात आली होती. त्यामुळे दळी जमिनींचे स्वतंत्र सातबारा उतारे उपलब्ध नव्हते. ही अडचण दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, दळी जमिनींचे सातबारा उतारे तयार करण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की, “दळी जमिनींना सर्व्हे नंबर नव्हता, तर त्यांना कंपार्टमेंट होते. त्यामुळे या सर्व जमिनींचे सातबारा तयार करण्याची मोहीम आम्ही सुरू केली आहे. सातबारा तयार झाल्यानंतर दळीधारकांच्या नोंदी त्यावर करून संबंधितांना सातबारा उताऱ्यांचे वितरण करण्यात येणार आहे.”
जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून दळी जमिनींच्या नोंदी आणि सातबारा उताऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या धारकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सातबारा उतारा उपलब्ध नसल्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातील नोंदी, शासकीय कामकाज तसेच विविध प्रशासकीय प्रक्रियांमध्ये दळीधारकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
आता प्रशासनाने सातबारा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. सातबारे तयार करून त्यावर पात्र दळीधारकांच्या नोंदी करण्यात आल्यानंतर त्यांचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे ही मोहीम वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण होण्याकडे दळीधारकांचे लक्ष लागले आहे.








