नगरसेवक पालकर यांच्या प्रयत्नातून श्रीबाग-म्हाडा कॉलनीच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण; उद्या उद्घाटन सोहळा


अलिबाग (प्रतिनिधी) : श्रीबाग-म्हाडा कॉलनी परिसराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून, या कामाचा उद्घाटन समारंभ शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. नगरसेवक तथा अलिबाग नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते ॲड. संदीप जनार्दन पालकर आणि नगरसेविका सौ. श्वेता संदीप पालकर यांच्या प्रयत्नातून हे सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

श्रीबाग-म्हाडा कॉलनीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे आकर्षक सुशोभीकरण करण्यात आल्याने परिसराच्या सौंदर्यात अधिक भर पडणार आहे. नागरिकांना परिसरात प्रवेश करताना सुंदर आणि प्रसन्न वातावरण अनुभवता यावे, तसेच परिसराची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

या सुशोभीकरणाच्या उद्घाटन समारंभाला अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि प्रदीप नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच श्रीबाग, म्हाडा कॉलनी आणि परिसरातील नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती अपेक्षित आहे.

स्थानिक परिसराचा विकास, नागरी सुविधा आणि सौंदर्यवृद्धीच्या दृष्टीने पालकर दाम्पत्याकडून करण्यात आलेल्या या प्रयत्नांचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत आहे.

या उद्घाटन सोहळ्याला श्रीबाग, म्हाडा कॉलनी तसेच परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. संदीप जनार्दन पालकर आणि नगरसेविका सौ. श्वेता संदीप पालकर यांनी केले आहे.