वरसोलीत वानराचा धुमाकूळ; वासराचा घेतला बळी, म्हशींवरही हल्ले


गुरांच्या गोठ्यांत घुसून चावे घेत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

अलिबाग (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरसोली येथील बापदेव आळी परिसरात गेल्या आठवड्यापासून एका वानराने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कधी झाडांवर लपून बसणारे, तर कधी थेट गुरांच्या गोठ्यात घुसून बांधलेल्या जनावरांवर हल्ला करणारे हे वानर परिसरातील नागरिक आणि पशुपालकांसाठी चिंतेचा विषय बनले आहे. या वानराच्या हल्ल्यात एका आठ दिवसांच्या वासराचा मृत्यू झाला असून, आज पुन्हा म्हशींवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र कवळे यांच्या वरसोली येथील बापदेव आळी परिसरात गेल्या आठवड्यापासून या वानराचा वावर आहे. हे वानर दिवसा झाडांवर लपून बसते, तर संधी मिळताच गुरांच्या गोठ्यात शिरून बांधलेल्या जनावरांना तोंडावर, नाकाजवळ तसेच शरीराच्या इतर भागांवर मोठमोठे चावे घेत आहे. या हल्ल्यांमुळे पशुपालकांमध्ये घबराट पसरली आहे.

गेल्या आठवड्यात प्रशांत दत्तात्रेय वर्तक यांच्या म्हशीला नुकतेच जन्मलेले अवघ्या आठ दिवसांचे वासरू या वानराच्या हल्ल्यात ठार झाले. या घटनेनंतरही वानराचा उपद्रव थांबलेला नाही. आज सकाळी सुमारे ८ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास गुरे गोठ्यातून बाहेर सोडण्याच्या वेळी या वानराने पुन्हा हल्ला केला. यावेळी इतर गोठ्यांतील म्हशींनाही लक्ष्य करत त्यांच्या तोंडावर आणि नाकाजवळ मोठमोठे चावे घेतले. राजेंद्र कवळे यांच्या गोठ्यातील एक म्हैस आणि दोन वासरांवरही हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

सुरुवातीला केवळ जनावरांवर हल्ले करणाऱ्या या वानराच्या आक्रमक वर्तनामुळे आता मानवी सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आज जनावरांवर हल्ला करणारे हे वानर उद्या माणसांवरही हल्ला करू शकते, अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. विशेषतः सकाळी गुरे चारण्यासाठी बाहेर सोडताना तसेच लहान मुले आणि नागरिकांची परिसरात वर्दळ असताना अशा प्रकारचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन वानराचा शोध घ्यावा आणि नागरिकांना तसेच पाळीव जनावरांना धोका निर्माण होण्यापूर्वी त्याचा योग्य बंदोबस्त करावा, अशी मागणी वरसोलीतील ग्रामस्थ आणि पशुपालकांकडून करण्यात येत आहे. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण असून, संबंधित विभाग आता काय उपाययोजना करतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.