तरुणाईच्या पुढाकारातून शहाबाजमध्ये दीपोत्सवाचा प्रकाश; १ हजार १११ दिव्यांनी उजळले श्री भैरवनाथ मंदिर!


अलिबाग (प्रतिनिधी): भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन करत सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा भव्य दीपोत्सव शहाबाज येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. श्री शिव भैरव भजन मंडळ, शहाबाज यांच्या वतीने मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता श्री भैरवनाथ मंदिर परिसरात १ हजार १११ दिव्यांचा दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचे हे ११ वे वर्ष होते.

आधुनिकतेच्या युगात तरुणाईचा ओढा विविध गोष्टींकडे वाढत असताना, आपल्या गावातील धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक वारसा जपण्यासाठी तरुणांनी दाखवलेली आस्था आणि सामाजिक बांधिलकी या उपक्रमातून अधोरेखित झाली. केवळ उत्सव साजरा करणे एवढाच मर्यादित हेतू न ठेवता, आपल्या संस्कृतीशी नाते जोडणे, गावातील नागरिकांना एकत्र आणणे आणि नव्या पिढीपर्यंत परंपरांचे महत्त्व पोहोचवणे, हा या उपक्रमामागील सकारात्मक विचार आहे.

१ हजार १११ दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेला मंदिर परिसर, दीपोत्सवाचे मंगलमय वातावरण आणि परंपरेप्रती असलेली श्रद्धा यामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणे भैरवनाथ या त्यांच्या ग्रामदेवतेच्या पूजनाने झाली पहिला दिवा भैरवनाथाच्या चरणी डाॅ.सौ.प्रगती पाटील यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.त्यानंतर आसपास संपूर्ण तलाव परिसर हा दिव्यांच्या रोषणाईने उजळून काढण्यात आला प्रत्येक दिवा लावताना ग्रामस्थांच्या मनामध्ये आपापल्या श्रद्धास्थानाबद्दलचा असलेला अपार विश्वास दिसून आला. अशा उपक्रमांमधून तरुणांमध्ये सामाजिक जाणीव, संघटन कौशल्य, सेवाभाव आणि आपल्या गावाप्रती असलेली जबाबदारी अधिक दृढ होण्यास मदत होते.

श्री शिव भैरव भजन मंडळाच्या माध्यमातून गेली अकरा वर्षे सातत्याने जपली जाणारी ही दीपोत्सवाची परंपरा निश्चितच कौतुकास्पद आहे. जुन्या परंपरांना आधुनिक पिढीची साथ मिळाल्यास गावाची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध होऊ शकते, याचेच दर्शन या उपक्रमातून घडले.दीपोत्सवाची विहंगम दृश्ये ड्रोनच्या सहाय्याने तन्मय भगत याने टिपलीत.

श्रद्धेचा प्रकाश, तरुणाईचा उत्साह आणि सामाजिक एकोप्याची भावना यांचा सुंदर संगम घडवणारा हा दीपोत्सव शहाबाजच्या सांस्कृतिक परंपरेतील एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला.