अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील कुरुळ ते बेलकडे मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा फटका सध्या स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने या मार्गावर दररोज वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण होत आहे. अवघ्या पाच मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल एक ते दीड तास वेळ लागत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सकाळच्या वेळेत शाळा आणि महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, नोकरी-व्यवसायासाठी बाहेर पडणारे चाकरमानी तसेच स्थानिक नागरिकांना या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात वेळेत पोहोचणे कठीण होत असून नोकरदारांनाही कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होत आहे.
रस्त्याचे काम सुरू असताना आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. संथ गतीने सुरू असलेले काम, रस्त्यावर पसरलेली धूळ, वाहतुकीचे अपुरे नियोजन आणि ठेकेदाराच्या यंत्रणेची उदासीनता यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. रस्त्यावर ठेकेदाराचे मोठे ट्रक, मिक्सर आणि इतर अवजड वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
या संपूर्ण परिस्थितीत वाहतूक पोलिसांची यंत्रणाही अपुरी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि नियोजनाचा अभाव जाणवत आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने मात्र वाहतूक व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतल्याची भावना स्थानिक प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. सुट्टीच्या दिवसांत आक्षी, नागाव, मुरुड या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे आणि मुंबईसह विविध भागांतून मोठ्या संख्येने पर्यटक खासगी वाहनांनी या परिसरात दाखल होत आहेत. मात्र, रस्त्याचे काम सुरू असल्याने आधीच अरुंद झालेल्या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी होत आहे.
त्यात काही वाहनचालकांकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत चुकीच्या दिशेने किंवा बेशिस्तपणे मार्ग बदलून वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे समोरासमोर वाहने अडकून वाहतूक कोंडी अधिकच वाढत आहे. परिणामी स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कुरुळ ते बेलकडे मार्गावरील रस्त्याचे काम जवळपास महिनाभर सुरू राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहिली जात आहे. महिनाभर दररोज अशीच वाहतूक कोंडी सहन करायची का, असा संतप्त सवाल स्थानिक प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराने अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी. मोठे ट्रक, मिक्सर व अन्य अवजड वाहने वाहतुकीला अडथळा होणार नाहीत अशा ठिकाणी उभी करावीत. काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करावेत. तसेच रस्त्यावर नियमित पाणी मारून धुळीचा त्रास कमी करावा आणि गर्दीच्या वेळेत एकेरी वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशा मागण्या स्थानिक नागरिकांकडून होत आहेत.
रस्त्याचे काम विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असले तरी त्या कामामुळे नागरिकांना रोज जाण्यायेण्याकरिता त्रास होऊ नये, याची जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित यंत्रणेने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
Home ताज्या बातम्या कुरुळ ते बेलकडे रस्त्याच्या संथ कामामुळे वाहनचालकांना मनस्ताप पाच मिनिटांच्या प्रवासासाठी लागताहेत...








