ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या संपर्क सभेला नगराध्यक्षा अक्षया नाईक यांची उपस्थिती; विकासकामांना सहकार्याचे आश्वासन
अलिबाग (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नागरिकांच्या विकासकामांना प्राधान्य देतानाच त्यांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी अलिबाग नगरपरिषद निश्चितच सकारात्मक भूमिका घेईल, असा विश्वास नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा देत, संस्थेच्या माध्यमातून मांडण्यात येणाऱ्या प्रश्नांना आणि विकासकामांच्या मागण्यांना आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिक संस्था, अलिबाग यांच्या त्रैमासिक संपर्क सभेला रविवारी (ता. २९) नगराध्यक्षा अक्षया नाईक उपस्थित होत्या. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांचीही उपस्थिती होती. संस्थेच्या सदस्यांनी आपुलकीने दिलेले आमंत्रण आणि ज्येष्ठ नागरिकांचा आग्रह यामुळे आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे अक्षया नाईक यांनी सांगितले. आपल्या माणसांमध्ये आल्याचा आनंद वेगळाच असतो, अशा भावना व्यक्त करत त्यांनी ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेत संस्थेच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणणे, त्यांच्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सामाजिक उपक्रमांतून त्यांना सक्रिय ठेवणे यामध्ये संस्थेचे योगदान अधोरेखित करण्यात आले.
यावेळी बोलताना अक्षया नाईक म्हणाल्या की, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे आमंत्रण हे केवळ औपचारिक आमंत्रण नव्हते, तर आपुलकीने आणि ओढीने बोलावलेले आमंत्रण होते. त्यामुळे ते नाकारता आले नाही. ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे अनुभवी मार्गदर्शक असून त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक आहे. संस्थेच्या माध्यमातून पुढे येणाऱ्या विकासकामांच्या मागण्या असोत किंवा काही अडचणी असोत, त्या सोडविण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी संस्था करत असलेल्या कार्याला नगरपरिषदेच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करत सभेचा समारोप झाला.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र तथा आर. के. घरत, उपाध्यक्ष श्रीमती मेघना जी. कुलकर्णी, सचिव नथुराम तळेकर, पुरुषोत्तम दात्रात्रय साठे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.







