मुंबई : ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तासांत काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन मंत्रालयातून करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ढगाळ वातावरण, विजेच्या कडकडाटासह काही भागांत मुसळधार सरी पडू शकतात. पावसामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था आणि जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना सुरू असून, नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, नाल्याजवळ, सखल भागात किंवा झाडांखाली थांबणे टाळावे.
हवामानाशी संबंधित अधिक माहिती किंवा आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.









