फणसाड धरणात बुडून मुंबईच्या पर्यटकाचा मृत्यू


अलिबाग (प्रतिनिधी): – वर्षा सहलीसाठी मुंबईतून आलेल्या एका पर्यटकाचा मुरूड तालुक्यातील फणसाड येथील धरणात बुडून मृत्यू झाला. साहिल राजू रणदिवे (वय 24) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मुंबईतील अंधेरी येथील 11 तरुणांचा चमू बोर्ली गावाजवळ असलेल्या फणसाड धरण परिसरात आज वर्षा पर्यटनासाठी आला होता. त्यातील काहीजण पाण्यात पोहायला उतरले. पोहत असताना अचानक साहिल बेपत्ता झाला. पोहणाऱ्या तरुणांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो सापडला नाही. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी काही बचाव पथकांना साहिल याचा शोध घेण्यासाठी बोलावले. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या बचाव पथकाने शोध घेतल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास साहिलचा मृतदेह हाती लागला. रेवदंडा पोलिस ठाण्याचे उप निरीक्षक दीपक म्हशीलकर या घटनेचा तपास करीत आहेत.