भरत गोगावले यांचा पुन्हा पत्ता कट !


१५ ऑगस्टला रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
सरकारकडून आदिती तटकरेंना झुकतं माप, पालकमंत्रिपद मिळणार?

रायगड (खास प्रतिनिधी): राज्यात महायुती सरकार स्थापन होऊन दहा महिने उलटले असले तरी रायगड जिल्ह्याला अजूनही पालकमंत्री मिळालेला नाही. पालकमंत्रिपदावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस कायम आहे.शिंदे गटातील कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद मिळावे, अशी त्यांची आणि शिवसेनेतील आमदारांची मागणी आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना हे पद मिळावे, यासाठी प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा मान सरकारकडून आदिती तटकरे यांना देण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.रायगडमध्ये याआधीही पालकमंत्रिपदाचा वाद रंगला होता. हिवाळी अधिवेशनानंतर आदिती तटकरे यांची नियुक्ती झाल्यानंतर गोगावले समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर केवळ दोन दिवसांत ही नियुक्ती रद्द झाली होती. तरीदेखील प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनी तटकरे यांनीच ध्वजारोहण केले होते.दरम्यान, राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 11 ऑगस्ट रोजी परिपत्रक काढून यंदाच्या स्वातंत्र्यदिनी रायगड जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरे यांनाच देण्यात आल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे ध्वजारोहणाचा मान मिळेल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या मंत्री भरत गोगावले आणि त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे.