आदिती तटकरे-भरत गोगावले एकाच मंचावर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान उद्घाटन कार्यक्रमाला जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांची हजेरी
अलिबाग (खास प्रतिनिधी): रायगडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले यांच्यात वर्चस्वाचा संघर्ष सुरू आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यापासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरून या दोन नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला. गोगावले यांनी पालकमंत्रीपदासाठी आग्रह धरला, तर फडणवीस सरकारने ही जबाबदारी आदिती तटकरेंकडे सोपवली. यावर गोगावले आणि त्यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, ज्यामुळे पालकमंत्रीपदाचा निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला. मात्र, अलिबागमधील एका शासकीय कार्यक्रमात हे दोन्ही दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर एकत्र दिसल्याने वाद मिटल्याची चर्चा रायगडमध्ये रंगू लागली आहे.
राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अलिबाग येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला एकत्र हजेरी लावली. विशेष म्हणजे, दोघांनी एकमेकांच्या शेजारी बसून मनमोकळ्या गप्पा मारल्या. महायुती सरकारच्या स्थापनेपासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव होता. पण या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन सौहार्द दाखवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
आदिती तटकरे म्हणाल्या, “पालकमंत्रीपदाबाबत दोन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. आम्ही रायगडच्या विकासासाठी एकत्र काम करू.” तर भरत गोगावले यांनी, “आम्ही रायगडच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत, यात राजकारण आणू नये,” अशी भूमिका मांडली.
या दोन नेत्यांचे एकमेकांविरुद्धचे राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि वादाची पार्श्वभूमी पाहता, त्यांचा एकाच व्यासपीठावरील हा संवाद समर्थकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद मिटण्याची शक्यता आहे का? याबाबत रायगडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही नेत्यांनी दाखवलेल्या या सौहार्दामुळे पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.









