“माझी वसुंधरा” कार्यक्रम संपन्न – शेतकऱ्यांना योजनांचा लाभ


अलिबाग(प्रतिनिधी): “माझी वसुंधरा” या कार्यक्रमाला रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. मंचावर मान्यवर, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमात शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.

यावेळी पी.एम. किसान योजनेअंतर्गत चारशे शेतकऱ्यांना लाभाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. आयुष्यमान कार्ड गावातील ९०% लोकांपर्यंत पोहोचले असून त्याचेही वाटप झाले. संजय गांधी निराधार योजनेतून २८ महिलांना दरमहा १५०० रुपये मदत दिली जात आहे. अपंग कल्याण निधीतून दोन झेरॉक्स मशिन व एक पिठ गिरणी देण्यात आली. अटल विमा योजनेत ९०% महिला-पुरुषांना विमा संरक्षण मिळाले असून नरेगा व ई-श्रम कार्डचे वाटपही करण्यात आले.

आर.सी.एफ कंपनीच्या सहकार्याने हापूस आंबा व नारळ यांचे वाटप ४०० महिलांना करण्यात आले. तसेच जिवंत ७/१२ मोहिमेत शेतकऱ्यांना महत्त्वाचा दस्तऐवज प्रदान करण्यात आला. या मोहिमेला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून १९३९ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून पहिल्या ७/१२ उताऱ्याचे वाटप झाले होते.

जिल्हाधिकारी जावळे यांनी आदर्श शेतकरी म्हणून उपस्थित शेतकऱ्याचा सत्कार करून कार्यक्रमाची सांगता केली.