अलिबाग (प्रतिनिधी): अलिबागमध्ये आरटीओ विभागाची परवानगी नसताना बेकायदेशीरपणे रेंटल बाईकचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामुळे स्थानिक रिक्षा चालक-मालकांच्या उपजीविकेवर मोठे संकट ओढावले असून या रिक्षा चालक-मालकानी आक्रमक भूमिका घेतली आहे.
शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड.मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील रिक्षा प्रतिनिधी मंडळाने गुरुवारी (दि. 25) रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल व अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात अनधिकृत रेंटल बाईकवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा रिक्षाचालक संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
रिक्षाचालकांच्या मते, शहरात केवळ दोन परवानाधारकांना 10 ते 12 बाईक ठेवण्याची परवानगी आहे; मात्र हेच परवानाधारक 40 ते 50 बाईक रस्त्यावर सोडत आहेत. त्याचबरोबर इतर अनेकजण कोणतेही परवाने न घेता बेकायदेशीर धंदा करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पर्यटन हंगामात 500 ते 600 परवानाधारक रिक्षाचालकांच्या रोजीरोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अनेक कुटुंबे उपासमारीच्या संकटात सापडल्याचे निवेदनात नमूद आहे.
या प्रसंगी शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, तसेच अलिबाग ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी अफजल सय्यद, अमीन मुत पप्पू पडावे, शरद राऊत, स्वप्नील नाईक, मन्सूर आगा आणि संदीप म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.









