श्रीवर्धन समुद्रकिनारी लागलेल्या बोयामुळे खळबळ  तपासानंतर उलगडला प्रकार


श्रीवर्धन (प्रतिनिधी): श्रीवर्धन परिसरात रविवारी सकाळी समुद्रकिनारी एक भला मोठा बोया लागल्याने स्थानिकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. अचानक दिसलेल्या या वस्तूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र तपासाअंती हा बोया बाणकोट खाडीतून भरकटून आलेला असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

खालचा जीवना बंदर येथे चारचाकी वाहनांचे टायर लावलेला हा बोया वहात येऊन किनाऱ्यावर लागला होता. याबाबत मेरीटाईम बोर्डाचे कर्मचारी नीतेश तांबे यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि या बोयाचा उगम शोधण्यास सुरुवात केली.

तपासानुसार, बाणकोट खाडीत बागमांडला–बाणकोट दरम्यान चालू असलेल्या खाडी पुलाच्या पिलर बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या बार्जच्या कामात हा बोया वापरण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट सागरी पोलीस ठाणे हद्दीत काही दिवसांपूर्वी एक बार्ज बुडाला होता. तो समुद्रातून वर खेचण्यासाठी ओहोटीच्या वेळेस बोया बांधण्यात आला होता. भरतीच्या वेळी बोया पाण्यात तरंगून बार्ज उचलता येईल, असा हेतू होता. परंतु, हवामान अचानक खराब झाल्याने बोयाचा दोर तुटला आणि तो समुद्राच्या प्रवाहात भरकटत गेला. अखेरीस हा बोया आज सकाळी श्रीवर्धन किनाऱ्यावर येऊन लागला.

स्थानिक मच्छीमारांनी सांगितले की, बोया म्हणजे समुद्रातील बोटी सुरक्षित ठेवण्यासाठी बोटीच्या बाजूंना लावला जाणारा मोठा फुगवटा किंवा तरंगता गोळा असतो. तसेच बुडालेली बोट वर खेचण्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो.

बुडालेला बार्ज हा मुंबईतील अब्दुल रजाक अन्सारी यांच्या मालकीचा असून, त्यांनी २० ऑक्टोबर रोजी पुलाच्या पिलरचे काम सुरू असताना बोया भाड्याने घेतला होता. पण प्रतिकूल हवामानामुळे बोया तुटून समुद्रात वाहून गेला.

या घटनेनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेली घबराट लक्षात घेता, श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमेश पाटील यांनी परिसरातील नागरिकांना आवाहन केले की, “हा फक्त बांधकामासाठी वापरला जाणारा बोया असून कोणतीही धोक्याची शक्यता नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.”