महायुतीत कलह तीव्र : शिवसेना-राष्ट्रवादी युतीची शक्यता धूसर


रायगड (प्रतिनिधी): आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये कलह वाढण्याची शक्यता तीव्र झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेने मांडलेला आघाडीचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट शब्दांत नाकारला आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत जाण्याच्या मनस्थितीत नसल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले. त्यामुळे महायुतीच्या एकत्र येण्याची शक्यता धूसर झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी सांगितले की, शिवसेनेच्या काही नेत्यांकडून त्यांच्यावर सातत्याने टीका होत असतानाच मैत्रीचा प्रस्ताव पुढे आल्यामुळे त्याला गांभीर्याने घेणे शक्य नाही. शिवसेनेतील काही नेत्यांनी तटकरे यांच्यावर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि राजकीय सभांमध्ये तिखट टीका केली असून, त्यातून निर्माण झालेला तणाव अद्याप शमलेला नाही. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होण्याची शक्यता कमीच असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. केवळ पालकमंत्री पदावरून सुरू झालेला हा वाद विकोपाला गेला आहे. नगर पालिका मतदानाच्या दिवशीदेखील याची प्रचिती आली. महाड मध्ये मतदाना दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा सर्वांनी पाहिला आहे.

महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि परस्पर टीकेमुळे स्थानिक पातळीवरील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. येत्या काही दिवसांत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच या वादाला आणखी ऊत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.