अलिबाग-रोहा रस्त्याची दयनीय अवस्था आठ दिवसांत काम न सुरू झाल्यास शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग-रोहा मार्गाची दयनीय अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या रस्त्यावर असंख्य खड्डे निर्माण झाले असून काही ठिकाणी तर पूल कोसळण्याच्या अवस्थेत आहेत. स्थानिक वाहनचालक आणि नागरिकांना हा मार्ग “शापीत रस्ता” वाटू लागला असून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन करावा लागतो, अशी परिस्थिती झाली आहे.

या सततच्या दुर्लक्षामुळे नाराज झालेल्या शिवसेना (शिंदे गट) अलिबाग तालुकाप्रमुख अनंत गोंधळी यांनी सार्वजनिक बांधकाम आणि संबंधित विभागाला कठोर इशारा दिला आहे. “आठ दिवसांच्या आत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही, तर शिवसेना आपल्या पद्धतीने—शिवसेना स्टाईलने—भक्ती नव्हे तर शक्ती दाखवून आंदोलना ला उतरेल,” असा इशारा त्यांनी दिला.

गोंधळी यांनी पुढे सांगितले की, नागरिकांची होत असलेली हेळसांड असह्य आहे. रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अपघातांची शक्यता वाढली असून काही ठिकाणी तर रुग्णवाहिका व शालेय बसेसलाही मार्ग काढणे कठीण झाले आहे. या रस्त्याचे तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी त्यांनी केली.

स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाकडे तातडीने पाऊले उचलण्याची मागणी केली आहे. आता पुढील आठ दिवसांत विभागीय अधिकाऱ्यांची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.