रायगड (प्रतिनिधी): अलीबागच्या नागाव परिसरात दिसलेल्या बिबट्यामुळे स्थानिकांमध्ये निर्माण झालेली भीती अद्यापही कायम आहे. बिबट्याचे पहिले दर्शन झाल्यानंतर २४ तासांहून अधिक वेळ उलटला असला तरी त्याला पकडण्यात वनविभागाला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण असून गावात सतत चर्चेला ऊत आला आहे.
घटनेनंतर लगेचच वनविभागाने शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली. उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ८० कर्मचारी आणि अधिकारी परिसरात गस्त घालत आहेत. विविध ठिकाणी पिंजरे लावण्यात आले असून रात्री आणि पहाटेच्या सत्रात शोध वाढवण्यात आला आहे. मात्र संध्याकाळनंतर बिबट्या कुणाच्याच नजरेस न पडल्याने तो नागावच्या सीमारेषेबाहेर जाऊन आपल्या नैसर्गिक अधिवासाकडे परतला असण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे.
तरीही, या अंदाजाला पुष्टी मिळेपर्यंत शोधमोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले असून अनावश्यक बाहेर जाणे, विशेषतः रात्रीच्या वेळी, टाळण्यास सांगितले आहे. वनविभागाच्या पथकाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.
************
नागावमध्ये बिबट्या आल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या मदतीने वन विभागाने बिबट्याला शोधण्याची मोहीम हाती घेतली.बिबट्याला पकडण्यासाठीची टीम बोलावण्यात आली होती. बिबट्या लोकवस्तीत असल्याने त्याला पकडण्यासाठीची योग्य संधी आणि जागा सापडत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये अंधार पडल्यानंतरदेखील शोधमोहीम सुरु ठेवण्यात आली आहे. बिबट्या दिसल्याची बुधवारी चर्चा ऐकू येत होती; परंतु ठोस पुरावे सापडत नव्हते. यामुळे शोधमोहीम सुरु ठेवली आहे. बिबट्या हा वन्यप्राणी असल्याने तो त्याच्या नैसर्गिक अधिवासात गेला असल्याची शक्यता आहे. असे असले तरी बिबट्याची शोधमोहीम सुरु ठेवणार आहोत.
– राहुल पाटील,
उपवनसंरक्षक, अलिबाग-रायगड









