पनवेल (धनश्री रेवडेकर) : पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६६ चा निकाल निश्चितच विचार करायला लावणारा आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार व शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाळाराम पाटील यांनी दिली आहे. या प्रभागात मूलभूत नागरी समस्या मोठ्या प्रमाणात असतानाही, जनतेने पुन्हा त्याच मंडळींना निवडून दिले, ही बाब खंतजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, या प्रभागात पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, आरोग्य व इतर मूलभूत सुविधांचे गंभीर प्रश्न आहेत. अशा परिस्थितीत जनतेच्या मतदानाच्या हक्कावर परिणाम करणाऱ्या आणि पैशाच्या प्रभावाखाली निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्यात आली, हे लोकशाहीसाठी चिंताजनक आहे.
तथापि, जनतेने दिलेला निकाल आम्ही नम्रपणे स्वीकारत आहोत. लोकशाही व्यवस्थेत जनतेचा कौल अंतिम असतो, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. या निकालामुळे आमची लढाई थांबणार नाही, तर ती अधिक ताकदीने सुरू राहील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
जनतेच्या प्रश्नांचा जो डोंगर आज समोर उभा आहे, तो पाहता असा निकाल अपेक्षित नव्हता. तरीही, जनतेच्या हक्कांसाठी, अन्यायाविरोधात आणि पनवेलच्या विकासासाठी शेतकरी कामगार पक्ष सातत्याने रस्त्यावर आणि सभागृहात आवाज उठवत राहील, असा निर्धार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला.









