नाशिक (प्रतिनिधी): नाशिक येथील पोलीस परेड मैदानावर झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात एक वादग्रस्त प्रसंग घडला. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव उल्लेखले गेले नाही, यावर वनविभागातील दोन महिला कर्मचाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला.
कार्यक्रम सुरू असताना दर्शना सौपुरे (वनरक्षक) व माधुरी जाधव (वनविभाग) यांनी घोषणाबाजी करत “डॉ. बाबासाहेबांचे नाव का वगळले?” असा थेट सवाल उपस्थित केला. यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही महिलांना कार्यक्रमस्थळावरून बाजूला केले व पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले.
या घटनेनंतर राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. वंचित बहुजन आघाडीने या महिलांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा देत, महापुरुषांचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला. पक्षाच्या नाशिक शहर कमिटीने पोलीस ठाण्यात जाऊन दोन्ही कर्मचाऱ्यांची भेट घेतली तसेच त्यांचा सन्मानही केला.
दरम्यान, घोषणाबाजीदरम्यान दर्शना सौपुरे व माधुरी जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “ज्यांच्यामुळे आपण लोकशाहीचा उत्सव साजरा करतो, त्या राज्यघटनाकारांचे नाव भाषणात नसणे दुर्दैवी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान हक्क दिले असून, त्यांचे नाव पुसण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही सहन करणार नाही.”
या घटनेमुळे नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला वेगळेच वळण लागले असून, सामाजिक व राजकीय चर्चांना उधाण आले आहे.









