अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात मंगळवारी पहाटे वळीवाच्या पावसाने अचानक हजेरी लावली. पेण तालुक्यात पहाटेच्या सुमारास झालेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेषतः गणेशमुर्ती व्यवसाय, वीट भट्टी व्यवसाय तसेच आंबा पिकाला या पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोमवारी पेण परिसरात दिवसभर मळभ दाटून आले होते. मात्र पाऊस पडेल, अशी शक्यता फारशी वाटत नव्हती. मात्र मंगळवारी पहाटे सुमारे साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान तालुक्यातील अनेक भागांत अचानक पावसाला सुरुवात झाली. मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी जवळपास अर्धा तास कोसळत राहिल्या.
या अनपेक्षित पावसामुळे वीट भट्टी व्यावसायिक आणि गणेश मूर्तिकारांची मोठी धावपळ उडाली. उघड्यावर वाळत ठेवलेल्या गणेशमूर्ती तसेच कच्च्या विटा सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी व्यवसायिकांना घाईगडबड करावी लागली. मात्र अनेक ठिकाणी गणेशमूर्ती आणि कच्च्या विटांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, वळीवाच्या पावसाचा सर्वाधिक फटका आंबा पिकाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या आंबा पिकावर मोहोर येण्याची अवस्था असून, पावसामुळे हा मोहोर गळून पडण्याची किंवा फळधारणा कमी होण्याची भीती आहे. तसेच परागीकरणाच्या प्रक्रियेत अडथळे येण्याची शक्यता असून, झाडांना नवीन पालवी फुटण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकते.
याशिवाय, वाढत्या आर्द्रतेमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आंबा बागायतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम आंबा उत्पादनावर होण्याची शक्यता असून, शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे.









