अलिबाग (प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवणारे, नेहमी जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे आणि तब्बल सात वेळा उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे राज्याचे लाडके नेते अजितदादा पवार यांचे काल सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी विमान दुर्घटनेत आकस्मिक निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात शोककळा पसरली आहे.
अर्थमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय, विकासाभिमुख धोरणे आणि स्पष्ट नेतृत्वशैलीमुळे अजितदादा पवार यांचे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही आदराने घेतले जात होते. त्यांच्या निधनाने राज्याने एक सक्षम, अनुभवी आणि कणखर नेता गमावला आहे.
या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर आज खारेपाठा विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हाशिवारे येथील पक्ष कार्यालयासमोर शोकसभा आयोजित करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमितदादा नाईक यांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.









