एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणाऱ्या राजाभाऊंना साथ देण्याचे सकपाळांचे आवाहन


राजाभाऊ ठाकूर यांच्या सभेला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची उपस्थिती

अलिबाग(धनश्री रेवडेकर): ही निवडणूक केवळ सत्तांतराची नाही, तर लोकशाही वाचवण्याची आणि कोकणच्या अस्मितेची लढाई आहे. ‘आता नाही तर कधीच नाही’ याच निर्धाराने आपल्याला मैदानात उतरावे लागेल, अशा शब्दांत हर्षवर्धन सकपाळ यांनी महायुतीवर तोफ डागली. अलिबाग येथील प्रचार सभेत बोलताना त्यांनी भाजप आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली.

सकपाळ यांनी मोदी सरकारच्या जुन्या आश्वासनांचा पाढा वाचत टीका केली. “प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख येतील आणि दहशतवाद संपवू म्हणणारे आता कुठे आहेत? आज विकास नाही, ठोस योजना नाही, फक्त भाजपचा ‘पैसा फेक तमाशा देख’ असा कारभार सुरू आहे. लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा करून मूळ प्रश्नांवरून लक्ष भरकटवले जात आहे,असा आरोप त्यांनी केला.

अलिबागच्या जमिनी आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी गंभीर आरोप केले.
​भूमीपुत्रांचा लढा आहे. अलिबागमध्ये आल्यापासून फक्त ‘अदानी’ हेच नाव ऐकायला मिळतंय. भूमिपुत्रांना देशोधडीला लावून उद्योगपतींचे खिसे भरले जात आहेत.
आम्ही गरिबांच्या प्रश्नांसाठी मतांचा जोगवा मागत आहोत, तर दुसरीकडे कंटेनर भरून पैसे वाटले जात आहेत. ज्यांना कालपर्यंत खटारा नको होता, त्यांना आता रेंज रोव्हर हवी आहे, असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ यांच्याबद्दल बोलताना सकपाळ म्हणाले की, “राजाभाऊ म्हणजे ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ असणारे व्यक्तिमत्व आहे. ते खऱ्या अर्थाने ‘रिअल हिरो’ आहेत. कोकण वाचवण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी झुकणार नाही, तर लढून जिंकणार, हाच आमचा निर्धार आहे

भाषणादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावरही कडाडून प्रहार केला…
​मुख्यमंत्री म्हणजे केसाने गळा कापणारे आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रासाठी मोठे संकट ठरत आहेत. नागरिकांना भ्रष्ट करण्याचे काम सध्या भाजप करत आहे, पण जनता आता याला बळी पडणार नाही..

काँग्रेस आणि शेकापचा हेतू एकच असून कोकणची संस्कृती आणि जमीन वाचवण्यासाठी आघाडीला विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. अलिबाग हमारा है आणि राजाभाऊ आमचे लाडके अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.