हा माणुसकीचा विजय, शेकापची जादू आता संपली आमदार महेंद्र दळवींचा विरोधकांवर प्रहार


अलिबाग (प्रतिनिधी): हा विजय खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आणि सर्वसामान्य जनतेचा विजय आहे,अशा शब्दांत आमदार महेंद्र दळवी यांनी आपला आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने मिळवलेल्या यशावर भाष्य करताना त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
​आमदार दळवी म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना मंत्री भरत शेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री उदय सामंत या सर्वांच्या भक्कम साथीमुळेच हे यश मिळाले आहे. कित्येक वर्षांपासून सामान्य शिवसैनिक या विजयाची प्रतीक्षा करत होते, जी आज जनतेच्या आशीर्वादाने पूर्ण झाली आहे.

​यावेळी त्यांनी शेकापचे नेते जयंत पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला. जयंत पाटील यांची जादू आता ओसरली असून, जिल्हाप्रमुख राजा केणी आणि आमच्या कामाची जादू जनतेने स्वीकारली आहे. जुन्या राजकारणामुळे शेकाप पक्ष आता संपण्याच्या मार्गावर असून जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारले आहे, अशी टीका त्यांनी केली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून हा विजय त्यांना समर्पित करत दळवींनी शुभेच्छा दिल्या.हा विजय केवळ राजकारणाचा नसून माणुसकीचा आहे,असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.