अलिबाग (प्रतिनिधी) : देशातील विविध कामगार व कर्मचारी संघटनांच्या निर्णयानुसार प्रलंबित मागण्यांसाठी देशभरात सुमारे पाच कोटी कामगार-कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संयुक्त कृती समितीच्या वतीने धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले.
यावेळी कामगार प्रतिनिधींनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. चार कामगार संहिता रद्द कराव्यात, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात, आठवा वेतन आयोग तात्काळ लागू करावा, तसेच शासकीय व निमशासकीय विभागांतील रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय सर्व कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करावी, वाढती महागाई आटोक्यात आणावी आणि खासगीकरण व कंत्राटीकरणाच्या धोरणांना स्थगिती द्यावी, अशा मागण्याही आंदोलकांनी केल्या.
कामगारांच्या प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.









