रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सत्तास्थापनेची शक्यता आता अधिक बळकट झाली आहे. शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवले जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ५९ जागांपैकी भाजप, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांकडे मिळून ३५ जागांचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामध्ये भाजपकडे १५, राष्ट्रवादीकडे १६ आणि ठाकरे शिवसेनेकडे ४ जागा आहेत. कर्जत-खालापूरमधील राष्ट्रवादी–ठाकरे शिवसेना युतीमुळे हे संख्याबळ निर्णायक ठरत आहे.
राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी भाजपसोबत युतीचे संकेत दिल्यानंतर भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांनीही दोन्ही पक्षांच्या आघाडीबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी ठाम असून शिवसेनेचा सहभाग वरिष्ठ पातळीवरील निर्णयावर अवलंबून राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेबाबत चर्चा केल्याचे वृत्त आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेत अंतिम सत्तासमीकरण काय ठरणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Home ताज्या बातम्या रायगड जिल्हा परिषदेत भाजप–राष्ट्रवादी सत्तेची समीकरणे स्पष्ट; शिवसेना सत्तेबाहेर?









