अलिबाग (प्रतिनिधी): माझी वसुंधरा अभियानामध्ये रायगड जिल्हा परिषदेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकविला आहे. ग्रामपंचायत गटात राज्यस्तर व विभागस्तरावर जिल्ह्यातिल 8 ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या अभियानाचा निकाल मंगळवारी (ता.17) सायंकाळी जाहीर झाला. जिल्ह्यातिल 8 ग्रामपंचायतींनी विविध गटांत यश मिळवत 5 कोटी 50 लाखांची बक्षिसे पटकावली आहेत.
माझी वसुंधरा अभियान 5.0 हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबविण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मुल्यमापन व फिल्ड मुल्यमापन त्रयस्त यंत्रणांमार्फत करण्यात आले. या दोन्ही मुल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माझी वसुंधरा अभियान 5.0 मधील लोकासंख्यानिहाय विविध गटांतिल पुरस्कार जाहीर करण्यात आले.
1 ते 1.5 हजार लोकसंख्या गटांत खालापूर तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक (बक्षीस 1 कोटी) व भूमी थीमॅटिकमध्ये राज्यात उच्चतम कामगिरीचा प्रथम क्रमांक (बक्षीस 50 लक्ष) अशी 1.50 कोटीची बक्षीसे पटकवली आहेत. तसेच 5 ते 10 हजार लोकसंख्येत राज्यस्तरावर खालापूर तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक व 1 कोटीचे बक्षीस पटकवले आहे. याशिवाय 6 ग्रामपंचायतींनी कोकण विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून प्रत्येकी 50 लक्षचे बक्षीस मिळवले आहे. जिल्ह्यात 10 हजारपेक्षा जास्त लोकसंख्या गटात वासांबे ग्रामपंचायत, 5 ते 10 हजार लोकसंख्येत चैक ग्रामपंचायत, 3 ते 5 हजार लोकसंख्येत तांबाटी ग्रामपंचायत, 2 ते 3 हजार लोकसंख्येत तुपगाव ग्रामपंचायत, 1.5 ते 2 हजार लोकसंख्येत वडवळ ग्रामपंचायत व 1 ते 1.5 हजार लोकसंख्येत नारंगी ग्रामपंचायतीने यश मिळविले. तसेच कोकण विभागस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारे गटविकास अधिकारीचा पुरस्कार खालापूर पंचायत समितीच्या संदीप कराड व जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी करणारे गटविकास अधिका-यांचा पुरस्कार पोलादपूरच्या दिप्ती घाट व रोह्याच्या शुभदा पाटील यांना मिळाला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपुरे तसेच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. भारत बास्टेवाड व तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबविण्यात आले आहे. माझी वसुंधरा अभियानामध्ये रायगड जिल्ह्यातील विविध गावे हिरीरीने भाग घेत असून यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होणार आहे. राज्यपातळीवर उत्कृष्ट ठरलेल्या ग्रामपंचायतींचा, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकार्यांचा सत्कार मुंबईत शनिवार (ता.21) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
***********
माझी वसुंधरा अभियानामध्ये रायगड जिल्ह्यातील विविध गावांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आहे. स्वच्छता, प्रदूषण, स्वच्छ पाणी याबाबत सातत्याने चांगले काम करण्यात येत आहे. यापुढेही अशाच प्रकारे काम सुरू राहणार असून शासन स्तरावरून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचे काम करण्यात येत आहे. विजेत्या ग्रामपंचायतींचे अभिनंदन.
– नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद









