रायगड जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चा; प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक


रायगड (प्रतिनिधी) : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित प्रश्न सोडवावेत या मागण्यांसाठी रायगड जिल्हा परिषद मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज आक्रमक पवित्रा घेत रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथे आक्रोश मोर्चा काढला. मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करावी, लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीतील तफावत दूर करून सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, तसेच अन्य प्रलंबित प्रशासकीय मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांना वेतनातील विसंगतीमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप संघटनांनी केला.
कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आपल्या मागण्यांसाठी यापूर्वी अनेकदा निवेदने देण्यात आली, तसेच आंदोलनाचे इशारेही देण्यात आले; मात्र आश्वासनांपलीकडे ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, प्रशासनाच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास भविष्यात असहकार धोरण स्वीकारण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.