धैर्यशील पाटील यांना डावलल्याने राजकीय चर्चांना उधाण


रायगड (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांसाठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतून पेण तालुक्यातील खासदार धैर्यशील पाटील यांचे नाव वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपच्या कोट्यातील ४ जागांसाठी मोठी लॉबिंग सुरू असताना पक्षाने धक्कातंत्राचा अवलंब करत रामदास आठवले, रामराव वडकुते, माया इनवनाते आणि विनोद तावडे यांना उमेदवारी दिली आहे.

यामध्ये महायुतीच्या वाट्याला ६ जागा, तर महाविकास आघाडीला १ जागा मिळाली असून त्या जागेसाठी शरद पवार यांचे नाव निश्चित मानले जात आहे. मात्र रायगड जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवणारे धैर्यशील पाटील यांना पुन्हा संधी न दिल्याने स्थानिक पातळीवर नाराजीचा सूर उमटला आहे. या निर्णयामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा प्रभाव असल्याची चर्चा रंगली आहे. आगामी राजकीय समीकरणे आणि भविष्यातील संभाव्य महायुतीतील बदल लक्षात घेता पाटील हे तटकरेंसमोर पर्यायी नेतृत्व ठरू शकले असते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

दरम्यान, रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत पाटील यांच्या पत्नी व माजी अध्यक्षा नीलिमा पाटील यांचा झालेला पराभवही नेतृत्वाच्या निर्णयात निर्णायक ठरल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतच खासदारांच्या पत्नीचाच पराभव झाला असेल तर पुन्हा राज्यसभेची उमेदवारी का द्यावी असाही कुठे तरी नेतृत्वाने विचार केला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व घडामोडींमुळे धैर्यशील पाटलांची राज्यसभेतील टर्म केवळ २ वर्षांतच संपुष्टात आली आहे.