महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायला हवे : आँचल दलाल


अलिबाग (प्रतिनिधी ): महिला सर्व क्षेत्रांमध्ये काम करत आहेत. आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत, असे असले तरी महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायला हवे, असे प्रतिपादन रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी केले.
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे शनिवारी (दि.७) वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या  कर्तृत्ववान महिलांना तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले . रायगड पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहात आयोजित करण्यात पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून पोलिस अधीक्षक आँचल दलाल बोलत होत्या.
यावेळी रायगड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा  प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पुर्वा पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे नगरसेवक संदीप पालकर, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर, सर्व पदाधिकारी, सदस्य व तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर  उपस्थित होते.
 पोलीस अधीक्षक आँचल दलाल म्हणाल्या की,
लग्नानंतर महिलेला सासरचे नाव  मिळते. परंतु आई, वडीलांकडून मिळालेल्या संस्कारामुळे  महिला घडते हे विसरून चालणार नाही. महिलेला घरातील पुरुषांची साथ मिळणे आवश्यक असते. पुरुषांची साथ मिळाली तरच महिला पुढे जाऊ शकतात. पुरुषांनी आपल्या घरातील महिलांना साथ दिली पाहिजे.
 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे म्हणाल्या की,  आजही समाजात महिलांना स्वतःला सिध्द करावे लागते. तरीदेखील महिला खंबीरपणे उभ्या राहतात. पुर्वीपेक्षा आता महिलांना कौटूंबिक पाठींबा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. महिलांच्या प्रगतीमध्ये कुटूंबाकडून मिळणारी मोकळीकता, आत्मविश्वास आणि पाठींबा महत्वाचा आहे.
 शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पुर्वा पाटील म्हणाल्या की,  महिला विविध क्षेत्रात काम करून नाव कमवत असल्या तरी त्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी  आपल्या आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. घरातील लोकांची काळजी घेताना आपली काळजी देखील त्यांनी घ्यायला हवी.  अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचलन प्रफुल्ल पवार यांनी केले.  आभार प्रदर्शन राजेश भोस्तेकर यांनी  केले.