पिरवाडी समुद्रकिनारी भरतीत अडकलेल्या जोडप्याची थरारक सुटका


उरण (प्रतिनिधी) : उरण तालुक्यातील पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी दुपारी एक थरारक घटना घडली. समुद्रावर फिरण्यासाठी आलेले एक जोडपे अचानक वाढलेल्या भरतीच्या लाटांमध्ये अडकले. काही काळ त्यांचा जीव धोक्यात आला होता. मात्र नागाव सागर रक्षक दलाने तातडीने धाव घेत धाडसी बचावकार्य करत या दोघांना सुरक्षित बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, हे जोडपे समुद्रकिनाऱ्यापासून बरेच आतपर्यंत पाण्यात गेले होते. काही वेळातच भरती सुरू झाल्याने समुद्राचे पाणी वेगाने वाढू लागले. जोरदार लाटांनी त्या जोडप्याला चारही बाजूंनी वेढा दिल्याने त्यांना किनाऱ्याकडे परत येणे अशक्य झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी नागाव सागर रक्षक दलाशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आशिष काठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने समुद्रात उतरून बचावकार्य सुरू केले. उसळणाऱ्या लाटांमध्ये धाडसाने त्या जोडप्यापर्यंत पोहोचत त्यांनी त्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले.
या धाडसी बचावकार्यामुळे संभाव्य अनर्थ टळला असून नागाव सागर रक्षक दलाच्या तत्परतेचे स्थानिकांकडून कौतुक होत आहे. दरम्यान, पर्यटकांनी समुद्रातील भरती-ओहोटीचा अंदाज घेऊनच पर्यटनाचा आनंद घ्यावा आणि रील किंवा फोटो काढण्याच्या नादात जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.