रायगडावर प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड; शिवजयंतीदिवशी समाधी परिसरातील बॅरिकेट तुटलेले


रायगड (प्रतिनिधी) : राज्यभर तिथीनुसार ६ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराजांच्या समाधी परिसरात उभारण्यात आलेले लाकडी बॅरिकेट तुटलेले असून त्यांची दुरुस्ती करण्याऐवजी ते कापडी चिंध्यांनी बांधून ठेवण्यात आल्याचे चित्र शिवजयंतीच्या दिवशी पाहायला मिळाले. त्यामुळे शिवभक्तांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने येथे लाकडी बॅरिकेट उभारण्यात आले आहेत. मात्र काही बॅरिकेट तुटलेल्या अवस्थेत असून त्यांची अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तुटलेल्या भागाला तात्पुरत्या स्वरूपात कापडी चिंध्यांनी बांधून ठेवण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शिवजयंतीनिमित्त हजारो भाविक, शिवप्रेमी आणि पर्यटक रायगडावर दाखल झाले होते. अशा वेळी समाधी परिसरातील बॅरिकेटची ही अवस्था पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत प्रशासनावर टीका केली. शिवरायांच्या राजधानीतच असा निष्काळजीपणा दिसत असल्याने ऐतिहासिक वारशाच्या जतनाबाबत संबंधित यंत्रणांनी अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे मत शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींनी व्यक्त केले आहे.