रायगड जिल्हा परिषदेत शिवसेनेला दूर ठेवत भाजप-राष्ट्रवादी सत्ता स्थापनेच्या तयारीत


रायगड (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुती म्हणून सत्ता स्थापन करण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव पुढे आला होता. मात्र जिल्ह्यातील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी शिवसेनेला सत्तेत सामावून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून वाद सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्ह्यातील मंत्री व आमदार सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत राहिले. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी टोकाची टीका केल्याने दोन्ही पक्षांमधील मतभेद अधिक तीव्र झाले.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात शिवसेना नेतृत्वाने भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांवरही टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील दुरावा वाढल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याचा निर्णय भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या संदर्भात भाजपचे दक्षिण रायगड सरचिटणीस ॲड. महेश मोहिते यांनी सांगितले की, १२ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत रायगड जिल्हा परिषदेत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन होईल आणि पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष निवडला जाईल. ही आमच्यासाठी आनंदाची बाब असून त्यानिमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संयुक्त मेळावा देखील त्याच दिवशी आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याची तयारी जवळपास पूर्ण झाली असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. रायगड जिल्हा परिषदेत होणाऱ्या सत्ता समीकरणांमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.