रायगडमध्ये सत्ता स्थापन; सोशल मीडियावरून नाराजीचे सूर


अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषद सत्तास्थापनेनंतर महायुतीचे अंकगणित जुळले असले तरी अंतर्गत अस्वस्थता पूर्णपणे संपली आहे, असे म्हणणे सध्या तरी कठीण दिसत आहे. कारण सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यात शिवसेना शिंदे गटाला सुरुवातीची अडीच वर्षे अध्यक्षपद मिळावे, अशी अपेक्षा होती. मात्र ते शक्य झाले नाही. त्यामुळे पक्षाच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर “आजचा काळा दिवस”, “शादी में अब्दुल्ला दिवाना” किंवा “लगीन हाय लोकांचं, नाचतय येड्या…” अशा उपरोधिक पोस्टही समोर आल्या. या पोस्टमधून काही कार्यकर्त्यांची नाराजी व्यक्त होत असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र या प्रतिक्रिया अधिकृत भूमिका नसून स्थानिक पातळीवरील भावना म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
राजकीयदृष्ट्या पाहता, महायुतीत सामील झाल्यानंतर सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय आणि संयम राखणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सहयोगी पक्षांना कितपत स्वीकारार्ह ठरतील, हा देखील चर्चेचा विषय ठरत आहे.
एकूणच, रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाली असली तरी महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय साधत पुढे कसे काम केले जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.