अलिबाग (प्रतिनिधी): पेण तालुक्यातील दादर गावातील ग्रामस्थांनी सेझ प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनी परत मिळाव्यात, या मागणीसाठी शुक्रवारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. गेल्या १५ वर्षांपासून प्रकल्पाचे काम सुरू झालेले नसताना शेतकऱ्यांच्या जमिनी विनाकारण पडून राहिल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दादर परिसरातील शेतजमिनी सेझ प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र इतक्या वर्षांनंतरही या ठिकाणी प्रकल्पाची एक वीटदेखील उभी राहिलेली नाही. प्रकल्पाच्या नावाखाली घेतलेल्या जमिनींवर कोणतीही विकासकामे न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार किंवा पर्यायी भूखंड देण्याचे आश्वासनही पूर्ण झालेले नाही, अशी नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान, अनेक वर्षे शेती पडीत राहिल्याने जमिनी नापीक बनल्या आहेत. खारबंदिस्तीची बांध फुटल्यामुळे खारे पाणी शेतांमध्ये घुसले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या जमिनींचा कोणताही उपयोग होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. संपादित केलेल्या जमिनींचा योग्य वापर होत नसल्यामुळे भूसंपादन कायद्याच्या तरतुदीनुसार सातबारा कोरा करून या जमिनी मूळ मालकांना परत देण्यात याव्यात, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आले असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा २३ मार्च रोजी आणखी मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी यावेळी दिला.
मोर्चामध्ये दादर गावातील शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
Home ताज्या बातम्या सेझसाठी संपादित जमिनी परत करा : पेणच्या दादर ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा




