अलिबाग(प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील उमटे धरणातील गाळ काढण्याच्या मुद्द्यावरून स्थानिक पातळीवर नाराजी वाढत असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. उमटे धरण हे रायगड जिल्हा परिषदेच्या ताब्यात असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, माणगाव विभागाकडून गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उमटे धरण संघर्ष ग्रुपचे ॲड. राकेश नारायण पाटील यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत सरकारची भूमिका फसवी असल्याचा आरोप केला आहे. गाळ काढण्यासाठी योग्य ठेकेदार मिळत नसतील, तर शासनाने निविदेच्या अटी व शर्ती सुलभ करून ही प्रक्रिया त्वरीत पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, ऐतिहासिक चवदार तळ्याच्या संघर्षाला शंभरी पूर्ण होऊनही परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न कायम असल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात शासन अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे.
स्थानिक नागरिकांनी लवकरात लवकर गाळ काढण्याचे काम हाती घेऊन पाणी साठवण क्षमता वाढवावी, अशी मागणी केली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.





