अलिबाग (प्रतिनिधी): ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या ‘उमेद’ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत रायगड जिल्हा परिषदेमार्फत आयोजित मिनी व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवाचा समारोप मंगळवारी (ता. 24) उत्साहात झाला. या कार्यक्रमात एकूण 139 विविध पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
समारोप सोहळ्यास राजिप अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. तसेच अभिनेते भाऊ कदम आणि अभिनेत्री संजना काळे यांची विशेष उपस्थिती लाभली.
प्रास्ताविकात सीईओ नेहा भोसले यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत पुरस्कार्थी ग्रामपंचायतींचे अभिनंदन केले. भास्करराव पेरे पाटील यांनी ग्रामविकासासाठी पाणी, स्वच्छता, वृक्षलागवड आणि शिक्षणावर भर देण्याचे आवाहन केले. गावाच्या विकासात महिलांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
अभिनेत्री संजना काळे यांनी ‘उमेद’मुळे महिला बचतगटांना व्यासपीठ मिळाल्याचे सांगत त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तर अभिनेता भाऊ कदम यांनी शासनाच्या योजनांची माहिती गावागावात पोहोचविण्याची गरज व्यक्त केली.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगड जिल्ह्याच्या सामाजिक प्रगतीचा उल्लेख करत महिला बचतगटांना या प्रदर्शनातून मोठी संधी मिळाल्याचे सांगितले. अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने बचतगटांच्या महिलांना आर्थिक लाभ झाल्याचे नमूद केले.
या सोहळ्यात विविध पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना प्रधानमंत्री आवास योजना, राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजना, ‘माझी वसुंधरा’ अभियान तसेच ‘टीबीमुक्त ग्रामपंचायत’ उपक्रमांतर्गत गौरविण्यात आले. अलिबाग तालुक्यातील सहाण, पेढांबे, चिंचोटी व बेलोशी ग्रामपंचायतींना ‘टीबीमुक्त’ म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच विविध संस्था व ‘निक्षय मित्र’ यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचा समारोप सभापती वैकुंठ पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.





