रायगड (प्रतिनिधी) : पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्हा मध्ये वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. दि. २९ मार्च २०२६ पासून ‘विना हेल्मेट कारवाई अभियान’ राबविण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
शनिवार-रविवार तसेच सुट्ट्यांच्या दिवशी रायगडमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होतात. अनेक पर्यटक दुचाकीवर फिरताना हेल्मेटचा वापर करत नाहीत. याचबरोबर स्थानिक नागरिकांमध्येही हेल्मेट न वापरण्याची प्रवृत्ती दिसून येत आहे. परिणामी अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
महाराष्ट्र पोलिस मुख्यालय, मुंबई यांनी राज्यातील अपघातांचे प्रमाण २० टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील अपघातांचा आढावा घेतला असता, हेल्मेट न वापरल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या लक्षणीय असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार,
२०२४ मध्ये अपघातांमध्ये मृत्यू : ११०
२०२५ मध्ये अपघातांमध्ये मृत्यू : १०४
फेब्रुवारी २०२६ पर्यंत मृत्यू : २२
ही वाढती आकडेवारी लक्षात घेता, जिल्हा वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख रस्त्यांवर विशेष तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,
* दुचाकी चालवताना चालक आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट घालणे बंधनकारक आहे.
* कमी अंतर असो किंवा जास्त — हेल्मेट वापरणे अत्यावश्यक आहे.
* नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.
पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अपघात हे अंतर पाहून होत नाहीत, त्यामुळे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.





