मंत्र्यांचे अनावश्यक दौरे थांबवा – पंडितशेठ पाटील यांची मागणी


अलिबाग (प्रतिनिधी): राज्यातील मंत्र्यांचे अनावश्यक दौरे तातडीने रद्द करण्यात यावेत, अशी मागणी भाजप नेते व माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी केली आहे. त्यांनी याबाबत राज्याच्या सचिवांकडे लेखी निवेदन सादर करून परिस्थितीची गंभीर दखल घेण्याचे आवाहन केले.
पाटील यांनी सांगितले की, झेड सुरक्षा असलेल्या मंत्री व खासदारांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करावी. केवळ अत्यावश्यक आणि जनहिताशी संबंधित कामांसाठीच दौरे आयोजित करावेत. इतर सर्व बैठकांसाठी ऑनलाइन माध्यमांचा वापर करून प्रशासनिक कामकाज अधिक कार्यक्षम पद्धतीने पार पाडता येऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यामुळे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होईल आणि भविष्यात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य संकटांना सामोरे जाणे सोपे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “राज्य हे जनतेच्या पैशातून चालते, त्यामुळे त्या पैशाचा योग्य व जबाबदारीने वापर होणे अत्यावश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच लोकप्रतिनिधींनी सध्याच्या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन अनावश्यक खर्च टाळावा, अन्यथा जनतेत चुकीचा संदेश जाईल, असा इशाराही पाटील यांनी दिला.