विद्यानगर-अलिबाग येथे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची पालखी परिक्रमा उत्साहात संपन्न


अलिबाग (प्रतिनिधी) : सतगुरू श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट, विद्यानगर (प.), अलिबाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) यांच्या पालखी परिक्रमा सोहळा बुधवार, दि. १५ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाला.
या सोहळ्यानिमित्त सायंकाळी विद्यानगर येथील रॉयल मोटर ट्रेनिंग स्कूलपासून भव्य मिरवणुकीने पालखीचे आगमन झाले. ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि “श्री स्वामी समर्थ” च्या जयघोषात मिरवणूक विद्यानगर येथील स्वामी समर्थ मठात दाखल झाली. यावेळी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले.
स्वामी समर्थ मठात सायंकाळी पादुकांचे दर्शन सुरू करण्यात आले होते. भाविकांनी शांत आणि भक्तिमय वातावरणात दर्शनाचा लाभ घेतला. तसेच सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्री ८ वाजता आरती मोठ्या भक्तिभावात पार पडली.
गुरुवार, दि. १६ एप्रिल रोजी पहाटे श्री स्वामी समर्थ पादुकांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी पालखीचे प्रस्थान करण्यात आले असून ती पुढील प्रवासासाठी पेणकडे रवाना झाली.
या पालखी परिक्रमेच्या निमित्ताने विद्यानगर – अलिबाग परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आयोजकांची उत्कृष्ट व्यवस्था यामुळे हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.