संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून वाद; कारवाईची चित्रलेखा पाटील यांची मागणी


रायगड (प्रतिनिधी): शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शिर्षकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांच्याशी कथितपणे अर्वाच्च भाषेत संवाद साधल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेवर शेतकरी कामगार पक्षाने तीव्र निषेध व्यक्त केला असून, यामुळे लोकशाही मूल्ये आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर आघात होत असल्याची भूमिका मांडण्यात आली आहे.
शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, मात्र सार्वजनिक प्रतिनिधींनी संयम आणि जबाबदारीने वागणे अपेक्षित असते. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात चुकीचा संदेश जातो, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, पुस्तक किंवा विचारांशी असहमती असल्यास ती लोकशाही मार्गाने व्यक्त करणे आवश्यक आहे. धमकी किंवा अपमानास्पद भाषेचा वापर हा अस्वीकार्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. या घटनेची दखल घेऊन संबंधित आमदारावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.