
अलिबाग (प्रतिनिधी): आज कोळगाव येथे स्व. रुची राजेंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. श्री. ऋतिक राजेंद्र पाटील, समस्त ग्रामस्थ मंडळ कोळगाव आणि टाकादेवी स्पोर्ट्स क्लब, मांडवा यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेस रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य तथा मुख्य प्रतोद मा. श्री. अमितदादा नाईक यांनी व्यस्त वेळापत्रकातून उपस्थिती लावून स्पर्धेची शोभा वाढवली. यावेळी त्यांचा आयोजकांकडून यथोचित सत्कार करण्यात आला.
स्पर्धेतील ग्राउंड क्रमांक एक आणि दोनवरील सामन्यांचा टॉस अमितदादा नाईक यांच्या शुभहस्ते पार पडला. त्यांच्या उपस्थितीमुळे खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. रविंद्र (काका) ठाकूर हे देखील प्रमुख उपस्थित होते. त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत क्रीडा क्षेत्रातील अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
या कबड्डी स्पर्धेत विविध संघांनी सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. गावातील क्रीडाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आयोजकांनी स्पर्धेचे नियोजन आणि व्यवस्थापन उत्तमरीत्या पार पाडले.






