
रायगड (प्रतिनिधी): मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाला कोकणचे भाग्यविधाते स्वर्गीय ए. आर. अंतुले यांचे नाव देण्यात यावे, अशी जोरदार मागणी माजी आमदार तथा भाजप नेते पंडित पाटील यांनी केली आहे. रायगड जिल्ह्यातील विकासकामांच्या संदर्भात बोलताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
पंडित पाटील म्हणाले की, कोकणाच्या विकासात अंतुले साहेबांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबवले गेले आणि कोकणच्या पायाभूत सुविधांना चालना मिळाली. त्यामुळे मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गासारख्या महत्त्वाच्या मार्गाला त्यांचे नाव देणे ही त्यांच्या कार्याची योग्य दखल ठरेल.
ते पुढे म्हणाले की, रायगड जिल्ह्याचा विकास ज्या ज्या नेत्यांनी केला, त्यांचा आजच्या राज्यकर्त्यांना विसर पडला आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठी इतिहास दुर्लक्षित केला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “ज्यांनी कोकण घडवला, त्यांचे योगदान आज जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जात आहे,” असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी काही नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका करताना सांगितले की, “अंतुले साहेबांनी ज्यांना राजकारणात संधी दिली, मोठे केले, तेच आज त्यांना विसरत आहेत. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाला अंतुले साहेबांचे नाव देण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही पंडित पाटील यांनी व्यक्त केली. या मागणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






