
पुणे (प्रतिनिधी): बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी कामगिरी करत अजित पवार यांच्या 2019 मधील मताधिक्याचा विक्रम मोडला आहे. मतमोजणीच्या 20व्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांनी तब्बल 1 लाख 89 हजार मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. 2019 मध्ये अजित पवार यांनी मिळवलेल्या 1 लाख 65 हजार मताधिक्यापेक्षा हा आकडा अधिक ठरला आहे.
बारामती मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार यांचे वर्चस्व राहिले आहे. 2019 मध्ये त्यांनी 1 लाख 95 हजार 641 मते मिळवत मोठा विजय मिळवला होता. त्याआधी 2014 आणि 2009 मध्येही त्यांनी अनुक्रमे 89 हजार 791 आणि 1 लाख 2 हजार 797 मताधिक्याने विजय नोंदवला होता. 2024 मध्येही त्यांनी 1 लाख 81 हजार 132 मते मिळवत विजय कायम ठेवला होता.
या पार्श्वभूमीवर पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी मिळवलेले मताधिक्य हे बारामतीच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे. एकूण 2 लाख 23 हजार 705 मतदारांनी मतदान केले. विजयाचा जल्लोष टाळण्याचे आवाहन करत त्यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्यास सांगितले.






