
अलिबाग(जितू शिगवण) : अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालय ने यंदाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) मध्ये सलग चौदाव्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेतील नियमित ११७ तसेच खाजगीरीत्या प्रविष्ट ३ अशा एकूण १२० विद्यार्थ्यांनी एस.एस.सी. परीक्षेला हजेरी लावली होती. विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत.
यंदाच्या निकालात इंग्रजी माध्यमातील विद्यार्थिनी तनिष्का अमृता अमोल बने हिने ९५.२० टक्के गुण मिळवत संपूर्ण शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. सेमी इंग्रजी माध्यमातून सई कल्याणी सचिन पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर मराठी माध्यमातून दिक्षा सुजाता अमित सोनावणे हिने अव्वल यश संपादन केले.
विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रचिती यंदाच्या निकालातूनही दिसून आली. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण ९ विद्यार्थ्यांनी मिळवले असून, ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल १०८ आहे. विशेष म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याला ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेले नाहीत.
विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. शाळेतर्फे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.






