रायगडच्या राजकारणात खळबळ; चार दिवसांतच म्हसळा नगराध्यक्षांचा राजीनामा


शिवसेनेवर वरिष्ठांचा दबाव की सुनील तटकरेंची राजकीय गुगली?
म्हसळा (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतीत मोठी राजकीय उलथापालथ घडली असून, अवघ्या चार दिवसांपूर्वी नगराध्यक्षपदी निवडून आलेले शिंदे गटाच्या शिवसेनेचे शाहीद जंजीरकर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जंजीरकर यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे राजीनामा सादर केला. आपण कोणत्याही दबावाखाली नसून स्वखुशीने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले, तरी या राजीनाम्यामागील नेमके कारण काय याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वीच म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शाहीद जंजीरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेडगे यांचा पराभव करत सत्ता काबीज केली होती. सात नगरसेवकांच्या पाठिंब्यावर त्यांनी हा विजय मिळवला होता. मात्र, विजयाच्या अवघ्या चार दिवसांतच त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेतील अंतर्गत दबाव की राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांची राजकीय रणनीती, याची चर्चा रंगू लागली आहे.
१७ सदस्यीय म्हसळा नगरपंचायतीत शिवसेनेने ९ जागांवर विजय मिळवत गेली दहा वर्षे असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली होती. त्यामुळे हा निकाल खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात होता.
दरम्यान, सत्तांतरानंतर नगराध्यक्षांच्या दालनातून खासदार सुनील तटकरे यांचा फोटो हटवून त्या ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे फोटो लावण्यात आले होते. या घटनेनंतर स्थानिक राजकारण आणखी तापले. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षविरोधी मतदान करणाऱ्या सदस्यांवर कारवाईचा इशारा देत व्हीपही जारी केला होता.
शाहीद जंजीरकर यांच्या अचानक राजीनाम्यामुळे आता म्हसळा नगरपंचायतीत पुढील राजकीय समीकरणे काय असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि श्रीवर्धन मतदारसंघातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याचे संकेत या घडामोडीतून मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.